Friday, 25 April 2008

गुढीपाडव्याचे महत्त्व

गुढीपाडव्याचे महत्त्व

ब्रह्मादेवाने हे जग चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले असे पुराणात सांगितलेले आहे. त्यामुळे विश्वाचा वाढदिवस या गुढीपाडव्याला साजरा केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक सण मानला जातो. या दिवसासंबंधी विविध आख्यायिका प्रचलित आहेत. त्या अशा : १. शालिवाहन शकासंबंधी दोन कथा सांगितल्या जातात. शालिवाहन नावाच्या एका कुंभाराने मातीचे सैन्य तयार करून त्यांच्यात जीव भरला आणि त्यांच्या मदतीने शत्रूचा पाडाव केला. या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहन नृपशक सुरू झाला. म्हणजे मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड, पराक्रमहीन, दुर्बल, निजीर्व झालेल्या समाजामध्ये त्याने चैतन्य निर्माण केले असावे. समाजात स्वाभिमान, अस्मिता जागृत केली असावी. दुसऱ्या कथेप्रमाणे शालिवाहन राजाने अत्याचारी शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचातून जनतेची मुक्तता केली. या विजयाप्रीत्यर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून शालिवाहन शकाला प्रारंभ झाला. या वषीर् शालिवाहन शक १९३० चा प्रारंभ होत आहे. ज्यांनी विजय मिळविला तो शालिवाहन आणि ज्यांच्यावर विजय मिळविला ते 'शक' असा दोघांचाही अंतर्भाव 'शालिवाहन शक' यामध्ये करण्यात येतो. २. वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजैंद झाला. स्वर्गातील अमरेंदाने चैत्र शुक्ल प्रतिपदेला वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो. ३. भगवान श्ाी विष्णूंनी प्रभु रामचंदाचा अवतार घेऊन रावणासह दुष्ट राक्षसांचा पराभव केला. रावणाला ठार मारले. त्यानंतर प्रभु रामचंदानी चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला. त्यावेळी जनतेने गुढ्या तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले. तेव्हापासून दर चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढ्या तोरणे उभारून आनंदाचा विजयोत्सव दिन साजरा होऊ लागला. गुढीपाडवा असा साजरा करावा! गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची व परिसराची स्वच्छता करावी. अंगास सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करावे. नवीन वस्त्रे परिधान करावीत. दरवाजासमोर रांगोळी काढावी. देवांची पूजा करावी. घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. वेळूची (बांबूची) काठी घेऊन ती स्वच्छ धुवून तिच्या टोकाला तांबडे वस्त्र, फुलांची माळ, साखरपाकाची माळ घालून त्यावर एक लोटी उपडी ठेवावी. अशारितीने तयार केलेली गुढी, दारासमोर रांगोळी घालून उभी करावी. या गुढीस पूजा करून कडूनिंबाची कोवळी पाने घेऊन त्यात जिरे, मिरी, हिंग, सैंधव, मीठ व ओवा इत्यादी घालून ते मिश्ाण चांगले वाटावे आणि घरातील सर्वांनी थोडे थोडे खावे. पंचपक्वान्नाचे भोजन करून तो दिवस आनंदात घालवावा. या दिवशी चांगल्या कामाचा शुभारंभ करावा. अमेरिकेच्या नॅशनल सायन्स अकादमीने 'नीम : ए ट्री फॉर सॉल्विंग ग्लोबल प्रॉब्लेम्स' नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. कडूनिंबाचे फार महत्त्व आहे. म्हणूनच गुढीपाडव्याला कडूनिंब भक्षणाचे महत्त्व आहे. निम्बस्तिक्त : कटू : पाकेलघु : शीतोह्यग्नि-वात-कृत। ग्राही हृद्यो जयेत् पित्त-कफ-मेह-ज्वर-कृतीन्।। कुष्ठ-कासारूपी हल्लास-श्ववथु-व्रणात्। भूक न लागणे, उलट्या होणे, आम्लपित्त, कावीळ, मूळव्याध, पोटदुखी, पोटात जंत होणे, डोक्यात उवा होणे, वेगवेगळ्या प्रकारचे त्वचारोग, व्रण, जखमा, दाहरोग, विंचूदंश, सर्पदंश, अकाली केस पांढरे होणे, वेगवेगळ्या प्रकारचे ज्वर (ताप) मुखरोग, दातांचे आजार, नेत्रदोष, स्त्रियांचे आजार, सांधेदुखी इत्यादी आजारांवर कडूनिंब उपयुक्त आहे. मात्र तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच याचा उपयोग करावा. अति कडूनिंब सेवन आरोग्यास अपायकारक असते. जंतुनाशक म्हणूनही कडूनिंब उपयुक्त आहे. पंचांगाचे महत्त्व गुढीपाडव्यापासून, नवीन शालिवाहन शकवर्षारंभापासून नवीन पंचांगाची सुरुवात होते. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्ाावण, भादपद, आश्विन, कातिर्क, मार्गशीर्ष, पौष, माघ व फाल्गुन हे चांद-महिने एकामागोमाग येत असतात. भारतीय कालमापनात ऋतू व सण यांनी सांगड घातलेली आहे. त्यासाठी सौर व चांदपद्धतीचा मेळ घातलेला आहे. महिन्यांची नावे व आकाश यांचाही संबंध आहे. चैत्र महिन्यात चित्रा नक्षत्र रात्रीच्याप्रारंभी पूवेर्ला उगवून पहाटे पश्चिमेस मावळते. वैशाख महिन्यात विशाखा! ज्येष्ठात ज्येष्ठा! तसेच त्या महिन्यांच्या पौणिर्मेला चंद त्या त्या नक्षत्रापाशी असतो. म्हणजे चैत्र पौणिर्मेला चंद चित्रापाशी! जानेवारी-फेब्रुवारीचे तसे नसते. कलियुगाची एकंदर ४ लक्ष ३२ हजार वषेर् आहेत. त्यापैकी पाच हजार १०९ वषेर् झाली. गुढीपाडव्याला (06/04/2008) ५११० वर्षांचा प्रारंभ होईल. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या पाच अंगानी पंचांग बनते. इ.स.पूर्व १५०० वर्षांपासून तिथी प्रचारात आहेत. इ.स. पूर्व एकहजार वर्षांपासून वार प्रचारात आहेत. नक्षत्रेही इ.स.पूर्व १५०० वर्षांपासून प्रचारात आहेत. 'योग' हे पंचांगातील चौथे अंग इ.स. ७०० नंतरच प्रचारात आले. पाचवे अंग 'करवा' हे इ.स.पूर्व १५०० पासून प्रचारात आले. पंचांग म्हणजे आकाशाचे वेळापत्रक! वर्षभरातील खगोलीय घटनांचे वेळापत्रक पंचांगात असते. पंचांगे ही सूर्यसिद्धांत, ग्रहलाघव, करणकल्पकता या करणग्रंथांवरून तयार केली जात. सध्या पंचांगे ही संगणकावर तयार केली जातात. ती जास्त सूक्ष्म असतात.

- दा. कृ. सोमण

मराठी माणूस पेटत नाही, पेटला तर ऐकत नाही...

मराठी माणूस पेटत नाही, पेटला तर ऐकत नाही...

शाहीर आत्माराम पाटील

मराठी भाषा , मराठी माणूस आणि मराठी अस्मिता... याच प्रश्नांवर महाराष्ट्रातल्या भूमिपुत्र पेटून उठला होता. जीवाचा कोट करून लढला होता. १०५ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तेव्हा कुठे स्वतंत्र महाराष्ट्राचा मंगलकलश या भूमीत आला. पण आज ५० वर्षांनी तेच प्रश्न फडा काढून उभे राहिले आहेत. मराठी भाषा टिकेल काय ? मराठी माणूस राहिल काय ? मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव पुन्हा तर खेळला जाणार नाही ?...

शाहिर आत्माराम पाटील हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक नाव. मराठी माणूस हा शाहिरांच्या आस्थेचा विषय. काय वाटतं त्यांना या प्रश्नांविषयी ? का आजही पणाला लावावा लागतोय मराठीपणा ?... .................... '

मराठी भाषेत झालीया मिसळ

कर्ता कर्म सारं इंग्रजी दिसंल

क्रियापदापुरती मराठी असंल

इस्टॉप-बंद बेटा पब्लिक हसंल

हसंल तो सूं थयुं ?

धिस इस ए बॉम्बे

सब मिक्चर बन गयी

मिसळ झाली मुंबई रं दादा मिसळ झाली मुंबई '

असं त्यांनी १९६६ मध्येच लिहून ठेवलंय. आजही त्यात काही बदल झाल्याचं दिसत नाही. किंबहुना ही मिसळ वाढतच चालली आहे. मुंबईत फिरताना मराठीचं अस्तित्व कमी होत चालल्याचं जाणवतं. सारे हिंदी वा इंग्रजीतच बोलताना दिसतात. मुंबईतून मराठी संपली की काय , अशी शंका येते. पण ती शंका आज नव्हे , तर तेव्हाही त्यांना येत होती. केवळ भाषेबद्दलच नव्हे , तर येणाऱ्या लोंढ्यांविषयीही त्यांनी १९५९ मध्ये ' लाखाची बात ' नावाची लावणी लिहून चिंता व्यक्त केली होती. पुढे पुन्हा १९६५ मध्ये त्यांनी ' उपऱ्यांनी येथं केली सारी मिरासदारी ' नावाचं गीत लिहिलं. त्यात ते म्हणतात :

' ह्या मुंबईत अमुच्या झालो आम्ही भिकारी उप-यांनी येथ केली सारी मिरासदारी ।।

सवतासुभा अम्हाला गिरणीत मावळ्यांना बगळे धनिक देती शिरकाव कावळ्यांना भरतीत गुप्त चाले स्वाथीर् हरामखोरी ।।

भूगोल हा मराठी , इतिहासही मराठी घडवीत मुंबईला श्रमले इथे मराठी आली सुगी भरात टोळांची धाड आली ।।

घरचे धनी जहालो अपुल्या घरी हमाल घुसले भणंग त्यांनी बळकावला महाल आम्ही कमाई केली चोरा दिली तिजोरी ह्या मुंबईत अमुच्या झालो आम्ही भिकारी ।। '

हे सारं लिहिलं आहे शाहीर आत्माराम पाटील यांनी. शाहीर अण्णाभाऊ साठे , शाहीर गवाणकर , शाहीर अमर शेख , शाहीर नानिवडेकर यांच्या काळात शाहीर आत्माराम पाटील हे नाव झळाळत होतं , ते त्यांच्या शाहिरी लिखाणाने. स्वातंत्र्यासाठीचं आंदोलन असो की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ , गोवा मुक्ती आंदोलन असो की चीन वा पाकिस्तानबरोबरचं युद्ध प्रत्येक विषयावर शाहीर आत्माराम पाटील यांनी पोवाडे , लावण्या , समरगीतं , समूहगीतं , स्मरणगीतं अशा स्वरूपाचं विपुल लिखाण केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा गांधी , विनोबा भावे यांच्याविषयीची जशी त्यांची गीतं आहेत , तशीच इंदिरा गांधी यांच्याविषयीही आणि त्यांच्या आणीबाणीतल्या २० कलमी कार्यक्रमाविषयीही. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात तर शाहिरी ऐन भरात होती. शाहिरी कलापथकांचे कार्यक्रम शहरांपासून खेड्यांपर्यंत सर्वत्र व्हायचे. राजकीय , सामाजिक प्रश्नांवरची गीतं , प्रहसनं , विडंबनं ही मंडळी सादर करायची. या सर्व शाहिरांमध्ये आत्माराम पाटील यांचं लिखाण भलतंच धारदार आणि ओजस्वी असायचं. आताच्या पिढीला ना हे शाहीर माहीत आहेत ना त्यांचं लिखाण. कलापथकंही कमी होत गेली आणि असलेल्या कलापथकांचे कार्यक्रमही हल्ली फार होत नाही. .............

डिलाईल रोड म्हणजे आताचा ना. म. जोशी मार्ग. परळ रेल्वे वर्कशॉपच्या दरवाजासमोर एक हनुमानाचं आणि साईबाबांचं मंदिर आहे. तिथल्या कवळी कंपाऊंडमधल्या एकमजली चाळीत पहिल्या मजल्यावरच्या पहिल्याच घरात शाहीर आत्माराम पाटील राहतात. त्यांचं वय आहे ८४. ही चाळ दीडशे वर्षं जुनी आहे. तिथे पन्नासेक वर्षांपूर्वी त्यांनी हे घर ८०० रुपयांना घेतलं. आणीबाणीच्या काळात वसंतदादा पाटील यांनी शाहीर आत्माराम पाटील यांना २० कलमी कार्यक्रमावर आधारित गीतं लिहायला सांगितली. दादा स्वत: शाहिरांच्या घरी आले , तेव्हा तिथे वीजही नव्हती. दादांनी ते चित्र पाहून तुम्हाला घर देतो , असं त्यांना सांगितलं. इंदिरा गांधींच्या पुरोगामी धोरणांवर शाहीर खुश होते. त्यामुळे त्यांनी पोवाडा लिहून दिला खरा , पण सरकारकडून घर वा कोणतीच मदत घ्यायला नकार दिला. त्याच कवळी कंपाऊंडमधल्या छोट्याशा घरात संध्याकाळी शाहीर आत्माराम पाटील शिवरायांचं चरित्र वाचत बसले होते. ते टीव्ही फारसा पाहत नाहीत. टीव्हीवर फारतर बातम्या पाहतात. सिनेमा , नाटकंही नाही , मग सीरिअल्स तर सोडूनच द्या. वि. वा. शिरवाडकरांची नाटकं पाहिली असल्याचं त्यांना आठवतं. अनेक जण लेखक असतात , कवी असतात. पण आत्माराम पाटील यांच्यात शाहिरीची प्रेरणा कशी आली , हा प्रश्न मनाशी असतो. ते सांगू लागतात : आमचं गाव सफाळ्याच्या जवळ. जन्म १९२४ चा. लहान होतो , तेव्हा स्वातंत्र्यासाठीचं आंदोलन सुरू होतं. प्रभातफेऱ्या निघायच्या. प्रभातफेरी , स्वातंत्र्य हे फारसं काही कळायचं नाही. पण त्यात जायचो. त्यातून काही गोष्टी कळायला लागल्या. पारतंत्र्य म्हणजे काय , स्वातंत्र्य कशासाठी हे कळू लागलं. शिक्षण पूर्ण झालं फायनलपर्यंत , म्हणजे आताची सातवी इयत्ता. चळवळ चालूच होती. पुढे १९४५ च्या सुमारास पोटापाण्यासाठी मुंबईला यायचं ठरवलं. मी आणि राजा पाटील (म्हणजे राजा-राणी ट्रॅव्हल्सचे) साधारण एकाच काळात आलो. इथे घर नव्हतं. कॅडल रोडला बहिणीकडे राहायचो आणि महालक्ष्मीच्या पुलाखालच्या ओरिएंटल मेटल प्रोसेसिंग र्वक्समध्ये कामाला लागलो. ही कंपनी दादोबा ठाकूर यांची. दादोबा म्हणजे काँग्रेसच्या माजी आमदार शरयू ठाकूर यांचे सासरे. आमच्या गावातल्या विहिरींना वर्षाचे बारा महिने पाणी असायचं. त्यामुळे शेजारच्या दातिवरे गावातले शेतकरी आमच्या गावी येऊन वांगी पिकवायचे आणि मुंबईला पाठवायचे. गावी असताना व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना येणाऱ्या गुजरातीत लिहिलेल्या पट्ट्या (हिशेबाच्या पावत्या) मी वाचून दाखवायचो. मग मुंबईत नोकरी करताना आपणही मुंबईत भाजी आणून का विकू नये , असा मनात विचार आला. गावातल्या शेतकऱ्यांनी त्यासाठी खूप मदत केली. रघू गोविंद चौधरी आणि काही शेतकरी होते. गावातला मुलगा काही करतोय , हे पाहून त्यांनी पैशाचा विचार न करता भाजी पाठवायला सुरुवात केली. ती भाजी विरारला यायची. ती मी दादरला आणायचो. तिथल्या मंडईत (आताची सावरकर मंडई) एक गाळा भाड्याने घेतला. तिथे वांगी विकायचो , तसंच भुलेश्वर व इतर ठिकाणच्या व्यापा-यांकडे ती पाठवायचो. हळूहळू व्यापार वाढवायचं ठरवलं. मग गुजराथच्या अन्य शहरांतूनही भाजी येऊ लागली. पुढे भायखळा माकेर्टमध्येही स्वत:चा गाळा विकत घेतला. आजही आहे तो. नातेवाईक पाहतात तो व्यवसाय. भाज्या विकणारा हा व्यापारी. तो शाहीर कसा बनला , हा प्रश्न तर अधिकच जाणवू लागला. मग त्यांनीच सांगायला सुरुवात केली : लिखाणाची आवड तर होतीच. शिवाय गावात असताना जागरूक झालेल्या राजकीय आणि सामाजिक जाणिवाही कायम होत्या. भाजी विकून झाल्यावर इतर व्यापाऱ्यांकडून पट्ट्या गोळा करण्यासाठीही फिरावं लागायचं. तेव्हा मी पायजमा , झब्बा आणि त्यावर व्यापाऱ्यांप्रमाणे कोट घालायचो. कोटाच्या एका खिशात हिशेब , त्याच्या पट्ट्या वगैरे असायचं आणि दुसऱ्या खिशात छोटी डायरी. काम आटोपलं की मी राणीच्या बागेत जाऊन बसायचो आणि तिथे पोवाडे , गाणी वगैरे लिहायचो. ही गाणी व्यापारी , भांडवलदार यांच्या विरोधात असायची. हे माझ्यासोबतच्या व्यापाऱ्यांना कळलं , तर अडचणीत येऊ , या विचाराने मी आधी ' धरतीनंदन ' या नावाने लिहिलं. त्यांची ही व्यापाराची गाडी आपोआपच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाकडे आली. त्या काळात त्यांनी एक गोंधळ लिहिला... '

संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा ,

खुशाल कोंबडं झाकून धरा द्विभाषिकाचा दुतोंडी कावा

उडतोय माझा डोळा डावा

साडेतीन कोट सिंहाचा छावा

पकडाय मांडलाय पिंजरा नवा

वळीखलाय आम्ही जवाच्या तवा

शाहिरी साद गेली गावोगावा बेल्हारी ,

बेळगाव , पंढरी पारगाव , बोरी उंबरगाव ,

राहुरी जळगाव , सिन्नरी ठाणगाव , परभणी नांदगाव , व-हाडी वडगाव , सिरोचा-बरतार-भंडारा-चांदा , सातारा सांगली कारवार डांग अन् मुंबई माऊली जागृत केलाय दख्खन पुरा खुशाल कोंबडं झाकून धरा '

गोंधळ त्या काळात भलताच गाजला. पहिल्यांदा शाहीर आत्माराम पाटील यांनी शिवाजी पार्कवरच्या सभेत हा गोंधळ सादर केला. त्यानंतर शाहीर सिकंदर शेख यांनी आपल्या पल्लेदार आवाजात तो ठिकठिकाणी गाऊन लोकप्रिय केला आणि मग जवळपास सर्व कलापथकांनी गावागावांमध्ये हा गोंधळ सादर करून लोकजागृती केली. संयुक्त महाराष्ट्रासाठी एवढं मोठं आंदोलन झालं. १०५ हुतात्मे झाले. शाहिरांचाही आंदोलनात मोठा सहभाग होता. त्या संदर्भात त्यांना काँग्रेसच्या भूमिकेविषयी विचारता त्यांनी काँग्रेस आता त्या तोलामोलाचा पक्ष राहिला नाही , ही खंत बोलून दाखवली. संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश यशवंतराव चव्हाण यांनी आणला , असं म्हणतात. पण ते खरं नाही. त्यांनी कसला कलश आणला ? संयुक्त महाराष्ट्र झाला तो १०५ हुतात्म्यांमुळे. त्यांना खरंतर १०५ संवत्सर म्हणायला हवं... ते बोलत होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे , ही मागणी होती. पण आता मुंबई केंदशासित प्रदेश करण्याची चर्चा चालली आहे. मुंबईचं शांघाय करण्याचं घाटतंय. मुंबई हे आता कॉस्मोपोलिटन शहर बनलं आहे. महाराष्ट्राच्या या राजधानीमध्ये मराठी बोलणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे. इथला मराठी माणूस मुंबईबाहेर चालला आहे. त्या जागी परप्रांतीय येत आहेत. शाहीर आत्माराम पाटील यांच्या १९६५ मधल्या भाषेतच बोलायचं , तर इथे अमराठी लोकांचे लोंढे येत आहेत. संयुक्त महाराष्ट्र झाला , त्यालाही आज ४८ वर्षं झाली आहेत. मग या शाहिराचं संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण झालं , असं त्याला वाटतं का ? असे अनेक सवाल डोक्यात होते. पण शाहिरांची प्रत्येक प्रश्नाची उत्तरं स्पष्ट होती. एकूणच त्यांची भूमिका स्पष्ट होती. कुठेही मनात गोंधळ नव्हता : आधी भाषावार प्रांतरचनेनुसार अकरा राज्यं झाली होती. केवळ महाराष्ट्राचं घोडं अडवून ठेवलं होतं. पण आंदोलनामुळे संयुक्त महाराष्ट्र झालाच. पण तो स्थापन व्हायला १९६० उजाडलं. आता मुंबई कधीच महाराष्ट्रापासून तुटणार नाही. कारण मुंबई म्हणजे भुलेश्वरची महाअंबाबाई. ती या बेटावरची. तिचं आणि महाराष्ट्राचं नातं अतूट आहे. संबंध थेट आहे. मुंबई आणि महाराष्ट्राची माती एक आहे. ती तोडण्याचा प्रयत्न तेव्हाच हाणून पाडण्यात आला. त्यामुळे आता तसा प्रयत्न कोणी करणार नाही आणि कोणी तशी हिंमत वा विचार केलाच , तरी तो यशस्वी होणार नाही. मुंबई आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस तो यशस्वी होऊ देणार नाही. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. ती महाराष्ट्रात ठेवण्यासाठी , टिकवण्यासाठी केवळ मुंबईतलाच नाही , तर संपूर्ण महाराष्ट्रातला मराठी माणूस उठून उभा राहील. तो मुंबईला कधीच वेगळं होऊ देणार नाही. मुंबईत मराठी टक्का कमी होत चालला आहे. अमराठी लोकांची संख्या वाढत चाली आहे. परप्रांतीयांचं प्रमाण साठ टक्क्यांच्या वर गेलं आहे. मराठी भाषा बोलणाऱ्यांचं प्रमाण कमी होत चाललं आहे. मराठी माणसंही आता एकमेकांशी मराठीऐवजी हिंदीतूनच बोलताना दिसतात. मराठी बोलायची मराठी माणसालाच लाज वाटते की काय , अशी शंका येऊ लागली आहे. या साऱ्याचा परिणाम म्हणून मराठी संस्कृतीही टिकेल की नाही , अशी भीती बोलली जात आहे. मराठी अस्मिताच जर टिकली नाही , तर हे सारं कसं शिल्लक राहील ? शिवाय मराठी माणसाची लढाऊ वृत्ती कमी होत चालली आहे , तो आता पूवीर्सारखा चिडून उठत नाही... असे अनेक प्रश्न मनात येत होते. शाहीर आत्माराम पाटील यांच्याकडे या प्रश्नाची उत्तरं आहेत का , ती काय असतील.. ? आत्माराम पाटील यांची या प्रश्नांवरची उत्तरंही स्पष्ट होती. त्यांच्या मनात अशी कोणतीच भीती नव्हती. त्यांना मराठी भाषा , संस्कृती , अस्मिता या साऱ्यांविषयी आत्मविश्वास होता. मुंबईतून मराठी संपणार नाही. आता राजकीय नेतेच आपल्या मुलांना इंग्रजी शाळांत घालायला लागले आहेत , शिक्षणासाठी परदेशांत पाठवायला लागले आहेत. तेच काय मध्यमवगीर्य आणि गरीब मंडळीही मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घालतात. स्पधेर्च्या युगामध्ये हे सारं होणारच. ते थांबवता येणार नाही. पण त्यामुळे मराठी मरणार नाही. अन्य राज्यांमधले लोकही मुलांना इंग्रजी शाळांत पाठवतातच की. पण ते आपली भाषा टिकवतात. ती विसरत नाहीत. तेवढं आपणही केलं तरी पुरेसं आहे. शिवाय राज्याचा कारभार मराठीतून चालला की मग लोकांना ती बोलावीच लागते. आता अनेक अमराठी लोकही या राज्याची भाषा शिकू लागले आहेत. महाराष्ट्रातले लोक जोपर्यंत आपली भाषा बोलत आहेत , तोपर्यंत मुंबईतही मराठी राहणारच... ते सांगत होते. पण मराठी माणसाची लढाऊ वृत्तीच कमी होत चालली आहे ? या प्रश्नावर ते सांगतात. मराठी माणूस सहनशील आहे. याचा अर्थ तो लेचापेचा नाही. त्यात लढाऊ वृत्ती जन्मत:च येते. जेव्हा कोणी हल्ल्याची भाषा करतो , तेव्हा तो तुटून उठतो. मग ते एक रूपक सांगू लागतात:

घरात तीन भाकऱ्या होत्या.

नवरा म्हणाला : तू एक खा , मी दोन भाकऱ्या खाईन.

बायको उत्तरली , मी दिवसभर घरात काम करत होते. मला खूप भूक लागली आहे. त्यामुळे तुम्ही एक भाकरी खा , मी दोन भाकऱ्या खाणार.

दोघांत भांडण सुरू होतं. शेवटी असं ठरतं की दोघांनी आता झोपायचं. दोघांपैकी जे कोणी लवकर उठेल , त्याला एक भाकरी , दुसऱ्याला दोन भाकऱ्या. पोटात कावळे कोकलत असूनही दोघं झोपले. दोघांनाही झोप लागत नव्हती. पण आपण आधी उठलो , तर आपल्याला एकच भाकरी मिळेल , या भीतीने कोणीच उठत नव्हतं. रात्र संपली , दिवस उजाडला , दुपार झाली , संध्याकाळ होऊ लागली. शेजारचे लोक घाबरले. ते घरात शिरले. हाका मारू लागते. पण तरीही हे उठेनात. शेवटी ते मेले असावेत , असं समजून त्यांनी तिरडी बांधली. एकाच तिरडीवरून दोघांना न्यायचं ठरवलं. नेणारेही तिघंच होते. दोन जण पुढे आणि एक मागे. तिरडी स्मशानात नेली. लाकडं रचली. त्यावर हे देह ठेवले. लाकडं पेटवली. त्याची धग लागताच नवरा ओरडला : अगं , उठ. तू दोन खा , मी एक खातो. हे एकताच आपल्या तिघांना ही दोन भूतं खातील , असं वाटून तिघं पळत सुटले.

तात्पर्य काय , तर मराठी माणूस लवकर पेटून उठत नाही आणि पेटला तर कोणाला ऐकत नाही.

हे रूपक खरंच चांगलं होतं. पण तसं खरंच घडू शकतं ? शाहिरांना ती खात्री आहे. ते खचलेले अजिबात नाहीत. शाहिरांचा काँग्रेसशी संबंध , कम्युनिस्टांशी संबंध , समाजवाद्यांशी संबंध. हे असं कसं ? ते म्हणतात : काँग्रेससाठी मी अनेक गाणी लिहिली , मनापासून. त्यांचे जे काही चांगले कार्यक्रम होते , त्याच्या प्रचारासाठी ती होती. पण मी त्यांचा सदस्य झालो नाही. शिवाय आताची काँग्रेस त्या तोलामोलाची राहिलेली नाही. कम्युनिस्टांशी संबंध आला संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामुळे. पण त्यांचं सारं लक्ष सोविएट युनियनकडे असायचं. ते मला मान्य नव्हतं. समाजवादी मंडळी समाजाचा कायम विचार करत , पण प्रत्यक्षात ते समाजापासून तुटलेले असत. मला ते आवडत नसे. मराठीच्या प्रश्नावर शिवसेना सतत लढत आली आहे. त्याविषयी शाहिरांना काय वाटतं ? उत्तर भारतीयांच्या विरोधातल्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविषयी काय वाटतं ? ते या प्रश्नांवर बोलायला उत्सुक दिसले नाहीत. या मंडळींची दृष्टी व्यापक नाही , एवढंच त्यांनी बोलून दाखवलं. इथले बौद्ध मराठी आहेत , अनेक ख्रिश्चन आणि मुस्लिमही मराठी आहेत. धर्मांतरामुळे त्यांची भाषा बदललेली नाही. पण या वेगळ्या धर्मातल्या मराठी माणसांसाठी हे कोणीच लढले नाहीत वा लढत नाहीत , असं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. म्हणजे हा शाहीर खरोखर जाति-धर्म आणि पक्षनिरपेक्ष माणूस आहे तर! त्यांचा सानेगुरुजींशी संबंध आला होता. राज्यातल्या सर्व राजकीय नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. एसेम , डांगे , अत्रे , वसंतदादा... किती तरी नावं. पण त्यांनी स्वत:ला कोणत्याही पक्षाला बांधून घेतलं नाही. जात आणि धर्माविषयीची त्यांची मतं स्पष्ट व परखड. त्यांनी जातींची उतरंड , अस्पृश्यता , वेगळ्या पंगती या साऱ्याच्या निमित्ताने ज्ञातिविसर्जनाची लावणीही लिहिली आहे.

' एका धरतीच्या पोटी। नाना प्राणी जन्म घेती। त्यात माणसावाणी खोटी। जात मिळायची न्हाय।

बाप आभाळ आई धरती। एका रक्ताची कारटी । पण जातिभेद कोटी। नोंद मिळायची न्हाय।

धर्मासाठी जो तो मेला। येशू , रसुलल्ला। आम्ही करतो हल्लागुल्ला। त्यांच्या नावांवरती.... '

असं करत या लावणीमध्ये शंभरावर जातींची नावं येतात. हे सारं कुठून आलं ? ते सानेगुरुजींचा प्रभाव मान्य करतात. शाहिरी परंपरा संपली असं अनेकांना वाटतं. या बड्या शाहिराला काय वाटतं , हे समजून घेणं आवश्यकच असतं. ते म्हणतात : शाहिरी परंपरा संपलेली नाही. जेव्हा मोठं वादळ येतं , जेव्हा हल्ला होतो , जेव्हा युद्धं होतात , आक्रमणं होतात , तेव्हा शाहिरीला बहर येतो. आत्तापर्यंत अशाच काळात शाहिरीने समाजाला साथ दिली आहे , मार्गदर्शन केलं आहे , लढण्याचं रस्त्यावर येण्याचं आवाहन केलं आहे. जेव्हा सारं शांत असतं , तेव्हा शाहीर आणि त्याची शाहिरीही शांत असते. त्या काळात फारतर लोकगीतं जन्माला येतात. मग त्यांना अचानक त्यांचं एक गाणं आठवतं... रानात रान बाई डांगाचं लांब बांब डांगरी रांगांचं उंच उंच टिगो-या सागांचं गं रहाणं मराठी वाघाचं. हे गाणं तर महाराष्ट्रातल्या सर्व मराठी शाळांमध्ये गायलं गेलं असेल. त्यावर नृत्यं झाली असतील. या शाहीर आत्माराम पाटील यांनी पोवाडे , लोकगीतं , अभंग , समरगीतं , लावण्या , प्रहसनं , विडंबनं , आरती या साऱ्या प्रकारांचा वापर लोकजागृतीसाठी केला. आजही ते आपल्या भूमिकांबद्दल आग्रही आहेत. अजूनही घरात त्यांच्याशेजारी डफ असतो. मध्येच ते डफ हातात घेतात आणि मराठी आजही पणाला लागलेली नाही , याची खात्री देतात.

शिमगो रे शिमगो

शिमगो रे शिमगो - संजय परब

शिमगा म्हटला की कोकणी माणसाच्या अंगात संचारतं, शिमग्याची पालखी त्याच्या डोक्यात नाचायला लागते, बोंबा कानात घुमायला लागतात. मग त्याला वेध लागतात मुलखात जायचे... ................

आबोलीचो वळेसार टाळयेर गो! घो बोलयता माडेयर गो!!

तळकोकणात वेंगुर्ल्याचे गावकरी 'होळी' (पोफळीची झाडं) नाचवत घेऊन येत असताना पाठीमागून पोरांनी शिमग्याच्या आधीच चावट गाणी सुरू केलेली असतात. तर तिकडे वर कोकणात गुहागरकडे गोमूच्या नाचाची प्रॅक्टिस सुरू असते.

देवाची आरती, देव मला पावती! वोवालूया! वोवालूया!!

चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या आडव्या महाराष्ट्रात होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होत असला तरी कोकणातली होळी ही आपल्या वेगळ्या वैशिष्ट्याने सजते. लाल मातीच्या गाभ्यात उभ्या केलेल्या पोफळी-आंबारूपी होळीच्या ज्वाळा अंधार भेदून गगनाला भिडू पाहतात त्यावेळी कोकणी माणसांना काबाडकष्ट करण्यासाठी वर्षभराची ताकद मिळालेली असते. तर चाकरमान्यांना गच्च भरलेल्या ट्रेनच्या गदीर्त लोंबकळण्यासाठी, मुंबईतला संसार रेटण्यासाठी, गावच्या आवशी, बापाशीक-मोठ्या भावाक आधार देण्यासाठी जोर आलेला असतो.

रे झिला घराशीक आठव पाच तरी रुपये पाठव,

असं बापाला मुलाला पत्र पाठवण्याची गरज भासत नाही. शिमगा म्हटल्यावर बायकापोरांसकट, पैसे गाठीक बांधून तो गावाला निघालेला असतो. होळीच्या दिवसांत देवही देऊळ सोडून खांब्याच्या रूपाने चव्हाट्यावर आलेले असतात. भक्तांची गा-हाणी ऐकण्यासाठी!

कणकवलीत घाडीगावकरच्या अंगात अवसर आलेला असतो. अंग घुमायला लागतं, दोन्ही डोळे बंद करून, मुठी आवळून, सा-या शक्तीनिशी घुमणाऱ्या या झाडाला आपली व्यथा सांगितली की ती नक्की पूर्ण होणार असा विश्वास.

हू हू हू हू...

' देवा...माझ्या चेडवाचा लगीन जमना नाय. खूप यत्न केले. दिसाक बरा, कामाक वाघ. कोणच्याय घरात पडला तर नाव काढीत. आवशी बापाशीक पुन्हा बघुक नको. पण, असा काय होता! इलेली माणसा पुन्हा फिरनत नाय कित्याक... आम्ही कोणाचा काय वायट केला नाय, मग आमच्याच मागे किलेस कित्याक?'

अवसाराच्या तोंडून देव बोलतो...

हू हू हू हू...

' तुका काळजी कित्याक? मी काय ता बघून घेतंय. वर्साच्या आत लगीन जमतालाच. ही विभूत घे! पुडी लाल धाग्यात चेडवाच्या गळ्यात बांध! इलो माणूस मागे जावचोच नाय! देवांक विसरा नको. त्याची सेवा कर. जा!'

देवाची 'विभूत' घेऊन बाबी सावंत चेडवाकघेवन देवाच्या पाया पडता. मोठ्या उत्साहानं तो आता बेबल्याचा लगीन जमवण्यासाठी बाहेर पडणार असतो. लेकीच्या डोक्यार तांदुळ पडलेत आणि खळ्यात पंक्ती उठलेत, असं चित्र आताच त्याच्या डोळ्यासमोर दिसायला लागलेलं असतं. मुलीच्या लग्नाचीच गोष्ट नाही तर हरवलेलं ढोर, सतत आजारी पडणारा मुलगा, कोर्टकचेरी यापासून त्याला सुटका हवी असते आणि देऊळ सोडून चव्हाट्यावर आलेल्या देवाला तो हक्काने याची सोडवणूक करण्यासाठी विचारणा करतो. प्रश्ान् श्ाद्धा व अंधश्ाद्धेचा नसतो. भरवशाचा असतो! आधाराचा असतो!! होळीच्या निमित्ताने केलेल्या कामासाठी देवाकडून मिळवलेल्या संरक्षणाचा असतो.

वर दापोलीत बुरोंडी गावात देव देऊळ सोडून पालखीच्या रूपाने लोकांच्या दारी येतो. देव दारी येणार म्हटल्यावर घरोघरी उत्साहाने कळस गाठलेला! मुंबईत पोटापाण्यासाठी धावणारी सारी माणसं पोराटोरांसकट गावच्या घरी. अंगण शेणाने सारवून सज्ज. सड्यावरच्या गेरूने घराला तांबडा लखलखीत रंग आणि त्यावर चुन्याच्या नक्षी. पक्ष्याच्या, प्राण्याच्या, फुलांच्या, वेलींच्या. भांडीकुंडीही घासून स्वच्छ. नवा भात गिरणीला लावून आणलेला. वस्तीसाठी आलेला देव आणि त्याबरोबरची वाडीवरच्या माणसांच्या जेवणाची जय्यत तयारी. देव अंगणी येऊन गेला, याचा आनंद शंकर साळवीला वर्षभराचे कष्ट करण्यासाठी नवीन उमेद देणारा असतो. यासाठी तो वाडीकरांची आणि देवाची सेवा करण्याची एकही संधी सोडत नाही. घरातल्या पोरांना देवाच्या पायाशी घालतो आणि जयजयकाराने वाडी दणाणून निघते...

हुरा रे हुरा! आमच्या भैरी बुवाचा सोन्याचा तुरा!!

गणपतीनंतर कोकणात नवचैतन्य आणणारा सण म्हणजे होळी. वरच्या कोकणात गुहागर, श्ाीवर्धनपासून (Shreevardhan) चिपळूण, रत्नागिरीपर्यंत होळीला एकच धम्माल! गणपतीपेक्षा होळीला या भागात खूप महत्त्व. पाच दिवस, सात दिवस अग्नीच्या साक्षीने साजरा करायचा आनंद! खऱ्या अर्थाने हा लोकोत्सव असतो. लोकांनी लोकांसाठी लोकांकरता साजरा केलेला सण. भट-बामणांचा आधार न घेता! पूजाअर्चा मानकरी असलेल्या कुणबी, मराठ्यांनीच करायची. शिमग्याला भटजी लागत नाही. प्रत्येक गावानुसार हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. रत्नागिरीच्या पट्ट्यात सुरमाड, पोफळी, आंबा अशा वेगवेगळ्यात रूपात होळी सजते. होळी जाळण्यासाठी आपल्या बागेतून झाडे देण्यासाठी चुरस असते. पण होळी कुठून आणि कुठली आणायची यासाठी कौल लावला जातो, देवाला विचारणा होते! देवाने सांगितलं की सारा गाव होळी आणण्यासाठी बाहेर पडणार. ढोलताशाच्या गजरात, नाचत, गात ती गावात देवळाच्या समोर किंवा परंपरेनुसार ठरलेल्या जागी आणली जाते. आणि सुरू होतो शिमगा, पौणिर्मेच्या अगोदर तीन, पाच, सात दिवस. पौणिर्मेला मुख्य होळी जळण्याच्या अगोदर सारी वाडी, सारा गाव शिमगामय होतो. देवळाच्या मुख्य मंडपाच्या माडीवर ठेवलेली पालखी खाली आणली जाते. ही पालखी व त्यातले देव हा या सोहळ्याचा मुख्य गाभा असतो. तिला नवे रूप लावले जातं. रूप म्हणजे सजवणं. पालखी आणि मुख्य देवाच्या चांदी-पितळेच्या रूपातल्या मूतीर्ला दागिने, कपडे, नक्षीकामाने सजवलं जातं. माणगावपेक्षा सावडर््याची पालखी सरस असली पाहिजे, असं समस्त शिंदे मानकऱ्यांच्या बैठकीत ठरलेलं असतं. माणगावच्या राण्यांनी तोंडात बोट घातली पाहिजे, बस्स! आपला गाव, आपली पालखी!!

पालखी उचलायची कुणी, ती कुठल्या वाडीतून न्यायची, ती कुठे प्रथम थांबवायची, जागरण कुठे, जेवण कुठे, खेळे कुठे हे सारं सारं ठरलेलं आहे आणि त्याचा निर्णय पन्नास-साठ वर्षांमध्ये झालेला नाही, तर पार शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून त्याचा इतिहास आहे. आदिलशहाच्या राजवटीत कोकणातल्या महसूल वसुलीसाठी मराठे सरदारांना गावं वाटून देण्यात आली होती. पुढे शिवाजी महाराजांच्या काळातही ती प्रथा कायम राहिली आणि पुढे त्याची वहिवाट झाली. अनेक वाड्यांच्या मिळून बनलेल्या गावांमधून दस्त गोळा केला जाई आणि त्याची जबाबदारी एका सरदाराकडे असे. तोच त्या गावचा पुढारी. बारा-पाचाचे मानकरी त्यामधूनच निर्माण झाले.

गावचा कारभार बलुतेदार पद्धतीने हाकला जायचा. सोनार, चांभार, महार, कुंभार, मांग, बुरूड, कोळी, मुलाणी, ब्राह्माण अशा बलुतेदारांकडून गावच्या गरजा पूर्ण केल्या जात आणि त्याच्या बदल्यात या साऱ्यांना गाव आश्ाय देई. मुख्य मानकरी, जमीनदार त्यांना आपल्या जमिनीत घर बांधायला परवानगी देई. त्यांच्या पोटापाण्याची सोय करी. फक्त त्यांनी गावची कामं इनामेइतबारे करायची. त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून धान्य, अडल्या नडलेल्या मदत, घराकुसासाठी झाडपेड दिलं जायचं. बलुतेदारी पद्धतीने आता आतापर्यंत गावं सुखी होती. खूप सुखात नव्हती, पण दोन वेळच्या पोटापाण्याची सोय होती. बलुतेदाराचं दु:ख सारा गाव आपलं समजायचा. अडल्यानडल्या प्रसंगी त्याच्या मदतीला धावून जायचा. वेंगुर्ल्यात तर परबांनी एका बलुतेदाराला फक्त होळीचा खड्डा काढण्यासाठी कसायला आणि राहायला जमीन दिली. त्याचं गावासाठी वर्षातून एकच काम. फक्त होळीचा खड्डा काढायचा आणि होळी पौणिर्मेच्या दिवशी समस्त मानकऱ्यांच्या रांगेत उभे राहून गाऱ्हाणं घालायचं. गाव करील तो राव काय करील!

याच बलुतेदारीने गावच्या जत्रा, होळी, दसरा हे सार्वजनिक सणाचं महत्त्व अधोरेखित केलं होतं. १५ व्या शतकाचा इतिहास याला साक्ष आहे. होळीच्या निमित्ताने गावच्या वर्षाचा कामाचा आढावा घेतला जायचा. गावातला एखादा माणूस शिरजोर झाला तर होळीला गाऱ्हाण घातलं जायचं.

खाली सावंतवाडीत आकेरी गावात पेटत्या होळीच्या समोर देवळाचा पुजारी घाडीगावकर मानकऱ्यांच्या रांगेत उभा राहून पालखीतल्या देवाला साद घालायचा.

रे म्हाराजा! बारा ऱ्हाटीच्या, बारा वहिवाटीच्या म्हाराजा!! आज तुका सांगण्याक कारण म्हाराजा! पालवाचो तुकलो, गावाक ऐकना नाय, देवाक भिना नाय तू कायता बघून घे, वडाची साल पिंपळाक आणि पिंपळाची साल वडाक लावून तेचेच दांत तेच्याच घशात घाल रे म्हाराजा! वर्षाच्या आत, तुझो गुण दाखव म्हाराजा! होळीच्या खुटावर नाक घाशीत येव दे म्हाराजा!

घाडीचा गा-हाणं संपता संपताच सा-या गावक-यांचा एक सूर लागायचा... व्हय म्हाराजा!!

या गाऱ्हाण्यात प्रत्यक्षात देवालाच न्यायाधीश केल्याने, पालव आधीच टरकलेला असायचा. त्यातच गावच्या अघोषित बहिष्कारामुळे वर्षभरात त्याच्या नाकातोंडात पाणी जाई आणि नाक घासत तो पुढच्या होळीला गावाची, गावकऱ्यांची क्षमा मागे.

चुकी झाली रे म्हाराजा गाव, देव सांगीत तसा वागान रे म्हाराजा, ढोर चुकला, पण वाटेक इला आता घरात घे, पेज पाणी सुखान खाव दे!

गावकरीही त्याला मोठ्या मनानं क्षमा करत आणि होळीच्या समोर त्याने ठेवलेेलं पाच नारळाचं तोरण, पेढ्यांनी आलेल्या गावकऱ्यांचा तोंड गोड होई. माजोऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी कोकणात देव, सण यांचा आधार घ्यायचा, ही प्रथा पूवीर्पासूनची. नंतर कोर्ट-कचेऱ्यांचा आधार घेतला गेला, पण खूनखराबा तसा नाही. एकमेकांची डोकी फोडलीत किंवा एखाद्याला साफ खल्लास केला, असं उदाहरण विरळाच. वर्षानुवर्षं जिवाच्या आकांताने भांडतील, उरावर बसतील. पण ठार मारणार नाहीत. पण काही वर्षांपूर्वी रत्नागिरीत मि-या, मुरुगवाडा इथे होळीत कोणाची पालखी पुढे यावरून दोन गट एकमेकांच्या जिवावर उठले आणि शिमगा संपल्यानंतर सहा महिन्यांनी श्रावणात एका गटातल्या माणसाचा मुडदा पडला.

खरंतर आपला गाव, आपली पालखी याचा मार्ग ठरलेला. पण सत्ता व पैशाचा माज गावरहाटी बदलू पाहतोय. पण, अशी उदाहरणं हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकी. नवलाई, पावणाई, सातेरी, माऊली, रामेश्वर, वेताळ, रवळनाथ, वेतोबा या देवांचा धाक अजूनही कमी झालेला नाही. होळीवेळी तो प्रत्यक्षात साकारतो, इतकेच!

धाक-भीती, नाच-गाणी, खाणे-पिणे, शिवीगाळ-चोरीमारी, मान-अपमान हे सारे म्हणजे होळी..

होळी रे होळी पुरणाची पोळी! सायबाच्या बोच्यात बंदुकीची गोळी!! हाय रे हाय! दळव्याच्या संज्यात काय दम नाय!! नावेर्कराच्या बैलाचा ढोल! आणि तावड्याच्या नानाची टांग!!

होळीचा होम धडधडून पेटू लागला की या आणि यासारख्या असंख्य 'फाक' गुहागरपासून ते शिरोड्यापर्यंत वाडीवाडीत ऐकू येतात. मूठ आवळून तोंडावर नेत बो बो बो... करत सारा आसमंत गाजवून काढायची हीच असते संधी. शिवाय वाडीत खालीपिली त्रास देणा-यांच्या नावाने शिमगाही घालायचा असतो तो याचवेळी. नावासकट आणि तो समोर असताना. यावेळी सबकुछ माफ!

पालखी निघाली की अख्खा गाव तिच्या मागे. सावंत वाड्यातून जगताप वाडीत, बुरोंडी गावातून लाडघरपर्यंत नेताना पालखी नाचवणं हा भन्नाट प्रकार वर्षभराचे कष्ट विसरायला लावणारा. लाकडी कोरीव अशी ही पालखी शंभर दोनशे किलोची, पण 'सिंगल फसली' माणसं एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर, डावीकडून उजवीकडे, चारही दिशांना गोल गोल नाचवू लागली की थक्क व्हायला होतं. तीच गोष्ट होळीनिमित्त बाहेर पडणाऱ्या तळकोकणातल्या तरंगाची. हे तरंग नुसते खांद्यावर घेतले की हट्ट्याकट्ट्या माणसालाही घाम फोडणारे. पण एखादा शरीराने दुबळा तरंगकरी अवसार संचारल्यावर तरंग एकहाती नाचवतो. देवळाच्या प्रवेशद्वारावरून थेट गाभाऱ्यात शिरताना एका दमात शंभरेक किलोचे तरंग घेऊन जाताना त्याला मिळणारी ताकदही अचंबित करणारी!

कुठून येते ही शक्ती?

पालखी वाडी वाडीतून, तसंच एका गावच्या सीमेवरून दुसऱ्या गावात शिरताना सारा माहोल भारलेला असतो. शेकडो माणसं दहा-दहा मैल अंतरावर तहानभूक विसरून घराघरावरून पालखी नेणार. सीमेवर दोन गावच्या पालख्या एकेमकांना सामोऱ्या जातात त्यावेळी सारा आसमंत ढोलताशांच्या आवाजात दणाणून निघतो. हणैर्ंची पालखी मुरुडच्या पालखीला सामोरी गेली की दोन बहिणीच भेटल्याचा आनंद होतो. यावेळी एकमेकांच्या गावाची, गावकऱ्यांची, देवळाची विचारपूस होणार. वळणावर थोडी विश्रांती आणि प्रसादाची देवाणघेवाण झाली की पालख्या आपल्या ठरलेल्या मार्गावरून पुढे निघणार. ज्या ठिकाणी ही पालखी थांबेल तो त्या दिवसाचा राजा. हा राजा मग जमलेल्या प्रजेसाठी प्रसंगी कर्ज काढून जेवणावळ घालणार.

' देव उपाशी नाय गेला पायजेल, माझ्या दारातून भलं वरीसभर मी उपाशी राहीन, पण देवाचं पॉट रिकामी राहिलं नाय पायजेल...'

खरंतर देव जेवणार नसतो. देवाच्या निमित्ताने गाव जेवणार असतं आणि देवालाच तो गावाच्या रूपाने बघत असतो. दापोली, दाभोळपासून महाड, चिपळूण आणि रत्नागिरी ते थेट राजापूरपर्यंत पसरलेल्या बहुजन समाजासाठी होळी म्हणजे दिवाळी! नवीन लग्न झालेल्यासांठी तर देवदिवाळी! नवीन जोडप्यांचा जणू सोहळाच. मुंबईत पोटाची खळगी भरण्यासाठी कष्ट करणाऱ्या बहुजनांमधले युवक लग्न झाल्यानंतर हनिमूनला जाणार नाहीत, पण होळीला आपल्या गावी बायकोसकट हजर. पालखी जाऊन बसते, त्या सहाणेवर डोकं ठेवलं म्हणजे लग्नानंतरचं आपलं आयुष्य सुखी राहणार, यावर दृढ श्ाद्धा. वर्षभर पोरगा आला नाही तर चालेल, पण होळीला आलाच पाहिजे, असा आईबापाचा खास आग्रह! सहाणेवर डोका ठेवून म्हातारा आपल्या पोरासाठी हात जोडणार...

' माझा पक्या दूर मुंबईत. त्याची किरी वारी दूर कर. त्याच्या हाताला यश दे, पोटाला अन्न दे. वंशाला दिवा दे. पहिला पोरगा होऊ दे. राण्यांची वंशावल वाढू दे... पुढच्या येलेला सहाणेवर नारलाचा तोरण, पेढे ठेवन, गावाला जिलबीचं जेवणही घालीन.'

एकदा पालखीला हात जोडले की पक्या गण्या, मन्या, तुक्या, अज्यासकट शिमगा खेळायला मोकळा. पणसूद गावात तर भांगेसारख्या असलेल्या घोट्याने पाच दिवस धमाल. चढणाऱ्या घोट्याने अंग अंग पिसासारखं झालं की साऱ्या गावात पंख पसरून उंडगायचा मुक्त परवाना. कोणाच्या नावाने शिव्या घाला, कोणाच्या बागेतली केळी, शहाळी खा, कोणाची लाकडं उचलून होळीत घाला... नुसती धम्माल. लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता मुक्त परवाना दिलेला लोकोत्सव!

गुहागरकडे तर वाडी वाडीवर भांगेच्या वड्याच वाटल्या जातात. एकदा या वड्या दुधाबरोबर खाल्ल्या की मग कशाचीच शुद्ध राहत नाही. जेवायला लागला तर जेवतच राहतो. झोपला की दिवसभर उठतच नाही. बडबडायला लागला की सर्वांची पळापळ... याचवेळी साऱ्या पाच दिवसात खेळे, नमन, सोंगे, शबय, गोमू, दशावतार, जाखडी नाच यांनीही समुदावरच्या भाटापासून ते डोंगरातल्या वाडीपर्यंचा अख्खा कोकण गजबजून जातो. खेळे नमन, जाखडी नाच, दशावतार चव्हाट्यावर, देवळात... तर सोंगं, गोमू, संकासूर, राधा दारोदारी.

पासेर्कर दशावतार मंडळाचा स्त्रीच्या वेषातला पुरुष, राधा, मुदृंगाच्या तालावर फेर धरते आणि वेंगुर्ल्यात जणू नाटकच आकार घेतं. हाताच्या तालावर पायांना नाचावत गिरकी घेत राधा गाते, 'सांगा मुकुंद कुणी हा पाहिला...'

मालवणी राधा शुद्ध मराठीत गाणार! संकासूराला मात्र मालवणीत दे धमाल करण्याची मुभा.

' तुमच्या आवशीच्या घोवाक वागान खाल्यान तो... वाग काय खातलो म्हणा तुमच्या बापशीक. त्याका खावन वागच स्वर्गात जायत. रे मेल्यानो ताँड काय बगतास? घरात जावन काय तांदुळ-बिंदुळ, नारळ-बिरळ, पैशे घेवन येवा.'

राधा, संकासूराचा मान द्यावाच लागतो. तर, गावातली पोरंटोरं 'शबय' मागणार. दोन पैसे कमावणार.

ऐनाका बायना, घेतल्या बिगर जायना, पेटीको चावी लगता है हमको पैसा मिलता है चोर चोर कामाठी, उंदरानं पळवली लंगोटी, उंदराची आय कवट खाय, पेटीत पैसे ठेवले हाय...

तर तिकडे चिपळूण, मंडणगडला 'शेरणी' काढताना पालखीचा भन्नाट नाच व देवावरची श्ाद्धा असा अनोखा संगम बघायला मिळतो. मोकळ्या चव्हाट्यावर एक ठिकाणी नारळ पुरला जातो आणि तो पालखीने शोधून काढायचा. खुल्या मैदानात पालखीच्या नाचाला उधाण येते... खांदेकरी अशा काही किमयेने पालखी नाचवतात की एक क्षण आपल्याला वाटते की ती निसटणार तर नाही, पण हवेत हलकाच झोक घेत ती पुन्हा खांद्यावर स्थिरावते तेव्हा काळजात कुठेतरी धस्स झालेलं असतं. अचानक मोराच्या पिसासारखी भासणारी पालखी जड जड होत जाते आणि खांदेकरांच्या तालावर नाचण्याऐवजी तीच त्यांना घुमवायला सुरुवात करते. खेचत खेचत खांदेकऱ्यांनाच पालखी नारळ पुरलेल्या ठिकाणी घेऊन जाते आणि तिचा खूर आपटला जातो... पुरलेला नारळ सापडतो!

उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी म्हणण्याचा काळ औद्योगिकरणाच्या रेट्यात खाडीमागेर् समुदात वाहून गेला त्याला पाऊणशे वर्षं उलटून गेली. कुणबी व बलुतेदारी हातात हात घालून नांदत होती, तोपर्यंत गावकुसाला महत्त्व होतं. पण शेती आतबट्ट्याची झाली, सर्व व्यवहार पैशात होऊ लागल्यामुळे दापोलीपासून शिरोड्यापर्यंतच्या घरटी माणसाला शहरांचा आधार धरण्यावाचून पर्याय उरला नाही. पोटासाठी दाही दिशा पसरलेल्या कोकणी माणसाला आजही लाल मातीची, आपल्या कौलारू घराची, पडिक बनलेल्या जमिनीची ओढ लागते ती जत्रा, गणपती आणि होळीच्या निमित्ताने. तेच आज त्याच्या उरल्यासुरल्या आशेचा आधारवड बनलेत...

Thursday, 28 February 2008

प्रतिज्ञा मराठीची

मराठी ही माझी मातृभाषा आहे. मराठी भाषेवर माझे नितांत प्रेम आहे. माझ्या मायमराठीला मी सदैव मान देईन. इतर सर्व भाषांचा, नेहमी आदर करीन. त्या भाषा मायमराठीच्या, बहिणी आहेत. जागतिक व राष्ट्रभाषा याबरोबरच मी मराठीचा देखील नेहमी वापर करीन. मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. मराठी भाषेचे आद्य सारस्वत माऊली ज्ञानेश्वरांपासून सर्वच मला वंदनीय आहेत. महाराष्ट्राचे महत्व मराठी भाषेच्या विकासातच आहे, याची मला जाणीव आहे. मराठी भाषेची जडणघडण प्रादेशिक बोलींमधील विविधता व त्यातून निर्माण होणारी भारताची एकता आणि अखंडता जपण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन. मराठी भाषेच्या विकासार्थ जास्तीत जास्त निदोर्ष बोलेन, लिखाण दर्जेदार होण्यासाठी प्रयत्नशील राहीन. महाराष्ट्र माझा आणि मराठी माझी यांची सदैव आठवण ठेवीन. मराठीच्या विकासातच माझा विकास आहे. म्हणूनच मी मराठीच्या विकासार्थ झटेन. मी मराठी बोलतो, लिहितो आणि वाचतो, याचा मला अभिमान व स्वाभिमान आहे. जय मराठी जय महाराष्ट्र जय हिंद!

Wednesday, 27 February 2008

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

मराठी... लहानग्यांत खेळणारी... दिशांदिशांत दाटणारी... नभांतून वर्षणारी... नद्यांमधून वाहणारी आणि मदांध तख्त फोडणारी भाषा. या मायमराठीचे असंख्य विभ्रम बोलते झाले आहेत कविवर्य सुरेश भट यांच्या या रचनेतून...

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्या एक तो मराठी

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामानात दंगते मराठी

आमुच्या रगारगात रंगते मराठी

आमुच्या उराउरात स्पंदते मराठी

आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी

आमुच्या लहानग्यात रांगते मराठी

आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी

आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुला कुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी

येथल्या दिशादिशात दाटते मराठी

येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी

येथल्या वनावनात गुंजते मराठी

येथल्या तरुलतात साजते मराठी

येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी

येथल्या पिकांमधून डोलते मराठी

येथल्या नद्यांमधून वाहते मराठी

येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी

आपुल्या घरात हाल सोसते मराठी

हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी

शेवटी मदांध तख्त फोडते मराठी