Thursday, 28 February 2008

प्रतिज्ञा मराठीची

मराठी ही माझी मातृभाषा आहे. मराठी भाषेवर माझे नितांत प्रेम आहे. माझ्या मायमराठीला मी सदैव मान देईन. इतर सर्व भाषांचा, नेहमी आदर करीन. त्या भाषा मायमराठीच्या, बहिणी आहेत. जागतिक व राष्ट्रभाषा याबरोबरच मी मराठीचा देखील नेहमी वापर करीन. मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. मराठी भाषेचे आद्य सारस्वत माऊली ज्ञानेश्वरांपासून सर्वच मला वंदनीय आहेत. महाराष्ट्राचे महत्व मराठी भाषेच्या विकासातच आहे, याची मला जाणीव आहे. मराठी भाषेची जडणघडण प्रादेशिक बोलींमधील विविधता व त्यातून निर्माण होणारी भारताची एकता आणि अखंडता जपण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन. मराठी भाषेच्या विकासार्थ जास्तीत जास्त निदोर्ष बोलेन, लिखाण दर्जेदार होण्यासाठी प्रयत्नशील राहीन. महाराष्ट्र माझा आणि मराठी माझी यांची सदैव आठवण ठेवीन. मराठीच्या विकासातच माझा विकास आहे. म्हणूनच मी मराठीच्या विकासार्थ झटेन. मी मराठी बोलतो, लिहितो आणि वाचतो, याचा मला अभिमान व स्वाभिमान आहे. जय मराठी जय महाराष्ट्र जय हिंद!

Wednesday, 27 February 2008

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

मराठी... लहानग्यांत खेळणारी... दिशांदिशांत दाटणारी... नभांतून वर्षणारी... नद्यांमधून वाहणारी आणि मदांध तख्त फोडणारी भाषा. या मायमराठीचे असंख्य विभ्रम बोलते झाले आहेत कविवर्य सुरेश भट यांच्या या रचनेतून...

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्या एक तो मराठी

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामानात दंगते मराठी

आमुच्या रगारगात रंगते मराठी

आमुच्या उराउरात स्पंदते मराठी

आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी

आमुच्या लहानग्यात रांगते मराठी

आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी

आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुला कुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी

येथल्या दिशादिशात दाटते मराठी

येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी

येथल्या वनावनात गुंजते मराठी

येथल्या तरुलतात साजते मराठी

येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी

येथल्या पिकांमधून डोलते मराठी

येथल्या नद्यांमधून वाहते मराठी

येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी

आपुल्या घरात हाल सोसते मराठी

हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी

शेवटी मदांध तख्त फोडते मराठी